अंबाजोगाईचा पत्रकार कक्ष आदर्श घेण्यासारखा – एस. एम. देशमुख
अंबाजोगाई : मुंबईमध्ये पत्रकारिता करणं सोपं आहे, मात्र ग्रामीण भागात पत्रकारांना पत्रकारिता करणं कठीण असून पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये, असे उद्गार हभप शामसुंदर सोन्नर यांनी काढले तर मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला पत्रकार कक्ष हा अन्य तालुका संघाने आदर्श घेण्यासारखा व कौतुकास्पद आ,हे असे उद्गार एस. एम. देशमुख यांनी काढले.
दर्पण दिन व मूकनायक दिनानिमित्त आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाच्या उद्घाटन व पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्य आयोजित कार्यक्रमात हभप सोन्नर व अध्यक्ष पदावरून एस .एम. देशमुख हे बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शरद लोमटे, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. राजेश इंगोले, रामभाऊ कुलकर्णी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, तालुकाप्रमुख गजानन मुडेगावकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोन्नर महाराज म्हणाले की, एस. एम. देशमुख सरांचं काम मुबंईमध्ये येऊन पहायला पाहिजे, कोकणांमध्ये येऊन पहायला पाहिजे. पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये. मी मुंबईमध्ये क्राईम रिपोर्टरच काम केले. मुंबईमध्ये काम करणं सोपं आहे, मात्र ग्रामीण भागात पत्रकारांना पत्रकारिता करणे अवघड आहे. अमेरिकेच्या सविधांनापेक्षा भारताचे संविधान श्रेष्ठ आहे. आपल्या देवाची पूजा करायची असेल तर इतरांचा मत्सर करू नका, असा मौलिक सल्लाही यावेळी उपस्थितांना सोन्नर यांनी दिला.
यावेळी बोलताना एस. एम. देशमुख म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार कक्षासाठी प्रयत्न केले. दत्ता अंबेकर व त्यांच्या टीमने हा कक्ष सुशोभित करण्यासाठी पुढाकार घेतला व त्यामुळे आमच्या हॉलमध्ये आमचा कार्यक्रम घेण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचं भाग्य असून हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल राजकिशोर मोदी यांना धन्यवाद द्यावेच लागतील. संरक्षण कायद्यासाठी आम्हाला लढावं लागलं. पेन्शन मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत, आज राज्यात फक्त 140 पत्रकारांना पेन्शन सुरू आहे, यासाठी राज्य शासनाने 25 कोटी मुदत ठेव ठेवले आहेत. मात्र, 50 कोटी ठेवणे आवश्यक आहे, कारण याच्या व्याजामधून पत्रकारांना सुविधा मिळतील.
आमची बांधिलकी समाजाशी आहे. सर्व राजकीय नेते एकच असतात. पत्रकारांनी एकत्रित यावं म्हंटल तरी ते तुम्हाला येऊ देत नाहीत. प्रिंट मीडिया जगाला पाहिजे, यासाठी राजकीय मंडळींची साथ ही हवीच असते. राज्यात 156 पत्रकार कोरोना काळात गेले. यातील बहुतांश पत्रकार हे आपल्या निष्काळजी पणाने गेले, हे नाकारून चालणार नाही, असे असताना राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा द्यावा व प्रत्येकी 50 लाखांची मदत द्यावी, अशी आमची मागणी असताना ती मान्य झाली नाही. मात्र, अन्य 14 राज्यात पत्रकारांना कोरोना काळात लाखाने मदत मिळाली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपाचे अक्षय मुंदडा म्हणाले की, पत्रकारांच्या सभागृहाला लागेल ती मदत करू. माझी अपेक्षा आहे की, या हॉलमध्ये पाच संगणक असतील, तर त्यापैकी दोन संगणक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करावेत, अशी सूचना केली. बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी तोच धागा पकडत सभागृहाचे सुशोभीकरण चांगले झाले आहे, सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन चांगला पायंडा पाडावा. आणखीन सुधारणा करायची असेल तर आम्हाला एकांतात अथवा सार्वजनिक ठिकाणी सूचना कराव्यात. लागेल ती मदत करण्यास आम्ही मागे हटणार नाही, असे आश्वासित केले.
राजकिशोर मोदी यांनीही पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी श्रमदान करत सभागृहाचे सुशोभीकरण केले, त्याचे कौतुक करत लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला. अंबा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर बोलताना म्हणाले की, आडसकर कुटुंबाचे अंबाजोगाईच्या जनतेशी व पत्रकारांशी जुने नाते आहे, आम्ही इकडेतिकडे कुठेही असलो तरी अंबाजोगाईशी कायम नाळ जोडलेली आहे व राहील. सभागृहाचे बरेच काम झाले आहे, काही सुधारणा करायच्या असतील, त्यात नक्की हातभार लावू, असे अभिवचन दिले.
ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, राम कुलकर्णी, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. राजेश इंगोले, ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह पत्रकारिता पुरस्कार विजेते सचिन पवार व प्रवीण फुटके यांनी आपल्या भावना व्यक्त करत परिषदेच्या कार्याबद्दल कौतुक केले.
यावेळी परिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक व 1 हजार रुपये रोख देऊन आष्टी येथील दैनिक पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचिन पवार यांना स्व. नंदकिशोर पांचाळ व परळी येथील सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके यांना स्व. मौलाना मुश्ताक हुसेन पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी जिजाऊ वंदना सादर केली. सूत्रसंचालन प्रा. गोविंद जाधव व प्रा. अरुण गंगणे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक दळवे, पुनमचंद परदेशी, नागनाथ वारद, बालाजी खैरमोडे, गोविंद खरटमोल, मारोती जोगदंड, शेख मुशीर बाबा, व्यंकटेश जोशी, सय्यद नईम, अतुल जाधव, प्रशांत लाटकर, मारोती जोगदंड, एम. एम. कुलकर्णी, हनुमंत पोखरकर, नागेश औताडे, सतिश मोरे, सलीम गवळी, संजय रानभरे, ज्ञानेश मातेकर, अशोक कोळी, राम साबळे, गोविंद सूर्यवंशी, विश्वनाथ कांबळे, सिद्धीकी मिसाबोद्दीन, गणेश चांगिरे, रतन मोती, वसुदेव शिंदे, ताहेर पटेल, बालासाहेब ढगे, सचिन मोरे, अनिरुद्ध पांचाळ, दत्ता खोगरे, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले.