शिकण्याची जिद्द बाळगणाऱ्या गणेशच्या मदतीला धावून आले युवासेनेचे विनोद पोखरकर

अंबाजोगाई : वडिल अपंग, आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. जिथं हाता – तोंडाचा कसाबसा मेळ लागतो. त्या कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कुठून उपलब्ध होणार ? मात्र, अशाही स्थितीत परिस्थितीवर मात करीत गणेश सुधाकर पन्हाळे हा इयत्ता 4 थीचा 10 वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज 7 किलोमीटर सायकलने प्रवास करीत शिक्षण घेत आहे. असे कळताच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर धावून आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पोखरकर यांनी गणेश पन्हाळे या विद्यार्थ्याला रविवार, दिनांक 23 जानेवारीला सायकल भेट म्हणून दिली. तसेच त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली. 

अंगी जिद्द, चिकाटी व ध्येय समोर असेल तर परिस्थितीवर मात करता येते, याचा प्रत्यय गणेशने (रा.पाटोदा,म.) दाखवून दिला आहे. गणेश हा ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी वर्गात शिकत आहे. गणेश दुसरीत असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. मोबाईलअभावी तो ऑनलाईन शिक्षणापासून दुरावला. अशा मुलांचे शैक्षणिक वास्तव लक्षात घेऊन संभाजीराव बडगिरे विद्यालयाने मागील वर्षीचा अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करूनच पुढील वर्षाचे अध्यापन सुरू केले. त्यामुळे गणेश परत शिक्षणाच्या प्रवाहात आला. मात्र, आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा बंद झाल्या.

शाळेतील इतर मुले ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ लागली. मात्र साधनांच्या व्यवस्थेअभावी गणेश ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हता. तरीही नाऊमेद न होता, मला शिकायचं आहे. या ओढीने गणेश मोडकळीस आलेल्या सायकल वरूनच शाळेसाठी दररोज एकट्याने सात किलोमीटरचा प्रवास करीत होता.

एका बाजूला गणेशचे शिक्षण थांबतेय ही भीती, तर दुसरीकडे नको त्या संगतीमध्ये जाईल ही चिंता वाटल्याने गणेशच्या आईने शाळेचे समन्वयक प्रा. प्रीतम पन्हाळे यांच्याशी संपर्क साधत गणेशसाठी काहीतरी व्यवस्था करावी, अशी विनंती केली. मुलाच्या भवितव्याचा विचार करून गुरूजींनी लगेच जबाबदारी घेतली. दुसऱ्याच दिवसापासून प्रा. प्रीतम पन्हाळे यांनी स्वतःचे अकरावी, बारावीचे अध्यापन सांभाळत गणेशला एकट्याला नियमित शिकविणे सुरू ठेवले.

गणेश दररोजचा येण्याजाण्याचा प्रवास करून सकाळी शाळेत जातो व येतो. येवढंच नाही शेतात जाऊन आई – वडिलांना मदत करतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गणेशचा दिनक्रम चुकलेला नाही. गणेश पन्हाळे या विद्यार्थ्याची ही वस्तुस्थिती कळताच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर हे अस्वस्थ झाले. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आव्हानांना अधोरेखित करणारी देखील आहे.

परिस्थितीअभावी असे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर तर जात नाहीत ना ? याच विचाराने अस्वस्थ झालेल्या विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी गणेशला काही तरी मदत करणे गरजेचे आहे, याच विधायक उद्देशाने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पोखरकर यांनी गणेश पन्हाळे या विद्यार्थ्याला रविवारी गणेशच्या (रा.पाटोदा,म.) या गावी जावून त्याला सायकल भेट म्हणून दिली. तसेच त्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही घेतली.

यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर, केज विधानसभा अधिकारी अभिमन्यू वैष्णव, प्रा. प्रितम पन्हाळे, पत्रकार रणजित डांगे, दुरदर्शनचे प्रतिनिधी पत्रकार रोहिदास हातागळे, विद्यार्थी गणेश पन्हाळे, वडील सुधाकर पन्हाळे, आई मीना पन्हाळे, वसंत बुरगे, सुरेश पन्हाळे आदींची उपस्थिती होती.

युवासेना बीड उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर हे एक निष्ठावंत शिवसैनिक आणि माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक तर शिवसेनेचे दिवंगत तालुकाप्रमुख वसंतआप्पा पोखरकर यांचे पुतणे आहेत. विनोद यांचे संघटन कौशल्य, विशेषतः कोविड काळात तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि युवासेना सचिव वरूण देसाई, बीड जिल्हा विस्तारक अंकीत प्रभु, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके, जिल्हा समन्वयक प्राचार्य दुबे यांच्या मार्गदर्शनानुसार मागील पाच वर्षांपासून अंबाजोगाई शहर व तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून ते जनसेवा करून समाजातील गरजू, गोरगरीब, होतकरू तरूण वर्गाला भरीव सहकार्य करीत आहेत.