‘स्वाराती’ : डॉक्टर – रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणजे सुरक्षारक्षक – डॉ. विश्वजित पवार

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने सुरक्षारक्षकांचा कोरोना योध्दा म्हणून सम्मान

अंबाजोगाई : ग्रामीण भागातून येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांना जोडणारा एक दुवा म्हणजे ‘स्वाराती’ चे सुरक्षारक्षक, अशी भावना वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विश्वजित पवार यांनी व्यक्त केली. ते आज अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

यावेळी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, अभ्यागत मंडळाचे सदस्य कचरू सारडा, सुरक्षाधिकारी कैलास कुराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी शेरेकर, शेख मुजीब, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, सुनिल व्यवहारे, सय्यद अमजद उपस्थित होते.            

अंबाजोगाई शहरातील नावाजलेली अंबाजोगाई पिपल्स को – ऑप बँक ही बँकेचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘स्वाराती’ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षारक्षक यांना त्यांनी कोव्हिड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, गेली दोन वर्षे कोव्हिड महामारीत ‘स्वाराती’ च्या सुरक्षारक्षक यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, अधिसेविका, स्वच्छता कर्मचारी यांनी रुग्णांना जीवनदान देण्याचे अनमोल असे काम केले आहे. येथील सुरक्षारक्षक हे बाहेरून येणाऱ्या नवीन नागरिकांच्या मदतीला धावून जातात. कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून सुरक्षारक्षक यांनी बहुमोल असे कर्तव्य बजावली आहेत. कोरोना काळात स्वतःचे नातेवाईक जवळ येत नव्हते, मात्र येथील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना नवसंजीवनी देण्यासाठी मेहनत घेतली. प्रसंगी ते कोरोनाग्रस्त झाले, मात्र त्यांनी रुग्णसेवेचा वसा खाली पडू दिला नाही. या त्यांच्या ऋणातून काही अंशी का होईना आपण उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

यापूर्वीही बँकेच्या वतीने केवळ अर्थकारणच न करता सामाजिक भान ठेवून नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविकां, आशा वर्कर तसेच पोलीस बांधव, महसूल कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबतच कोव्हिड काळात उल्लेखनिय कर्तव्य बजावनाऱ्या सामाजिक संस्थांचा देखील सत्कार व सन्मान करण्यात आला असल्याचे राजकिशोर मोदी यांनी आवर्जून उल्लेखित केले. तसेच यापुढेही अंबाजोगाई पिपल्स बँक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजकिशोर मोदी मित्रमंडळ सदैव सामाजिक कार्यासाठी तत्पर असेल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमात वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विश्वजित पवार बोलताना म्हणाले की, ‘स्वाराती’ मध्ये अन्य जिल्ह्यातील व ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येतात. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातील बरीच ठिकाणे माहीत नसतात. तेव्हा ते रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे रुग्णालयातील माहितीसाठी बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षक यांचीच मदत घेतात. सुरक्षारक्षक देखील त्याच पोटतिडकीने त्यांना मदत करतात. तेव्हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून येथील सुरक्षा रक्षक काम करत आहेत, अशी भावना डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

कोरोना योध्दा सन्मान सोहळा पार पाडण्यासाठी  सुनील व्यवहारे, बाबा गित्ते, महेश वेदपाठक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रापतवार यांनी केले तर आभार सुनील व्यवहारे यांनी व्यक्त केले.