‘द हिट गर्ल’ आशा पारेख : ‘कटी पतंग’ साठी मिळाला होता ‘फिल्मफेअर’ पुरस्कार

टीम AM : गतकाळातील ‘ज्युबीली गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आशा पारेख यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म. 2 ऑक्टोबर 1942 ला झाला. 1959 ते 1973 साला दरम्यान आशा पारेख या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होत्या. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेख यांनी दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तीसरी मंझील इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 1971 साली प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ ह्या चित्रपटासाठी आशा पारेख यांंना ‘फिल्मफेअर’  सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता. 

आशा पारेख यांचा जन्म गुजरात येथील महुआ येथे एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होत्या. 1959 मध्ये नासिर हुसेन यांच्या ‘दिल देके देखो’ या सिनेमाद्वारे हीरोईनच्या रुपात झळकलेल्या आशा पारेख यांची बालपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र बालकलाकाराच्या रुपात संधी मिळाल्यानंतर आशा पारेख यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. 1952 साली ‘आसमान’ या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या आशा पारेख यांना या सिनेमानंतर बेबी आशा पारेख या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर एका स्टेज प्रोग्राममध्ये त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी ‘बाप बेटी’ या सिनेमात घेतले.

आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी प्रवासात अनेक अभिनेत्यांबरोबर काम केलं. मात्र त्यांची जोडी पसंत केली गेली ती अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर. ‘कटी पतंग’ या सिनेमात राजेश खन्ना यांच्या बरोबरची आशा पारेख यांची केमिस्ट्री लाजवाब होती. आशा पारेख यांनी शम्मी कपूर, शशी कपूर, देव आनंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना या नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केल. शास्त्रीय नृत्यात त्या निपूण आहेत. अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणाऱ्या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. 

दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. स्वतः आशा पारेख यांनी ही गोष्ट स्वीकारली होती. त्यांनी ‘कारवा’ आणि ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटामध्ये नासिर हुसेन यांच्याबरोबर काम केले होते. आशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. ‘कटी पतंग’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान, भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ (फिक्की) च्या वतीने लिविंग लेजेंड सन्मान मिळाला. 1992 साली त्यांच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने आशा पारेख यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. त्यांनी अनेक रिॲलिटी शो मधुन परिक्षक म्हणुन काम केले आहे. खालिद मोहम्मद या लेखकाच्या मदतीने 2017 साली ‘द हिट गर्ल’ शीर्षकाने आशा पारेख यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात निर्माते नासिर हुसैन यांच्याविषयीच्या नात्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

फिल्म इंडस्ट्रीत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळणे बंद झाल्यानंतर त्यांनी अभिनयापासून संन्यास घेतला. त्यानंतर 1990 मध्ये ‘ज्योती’ या गुजराती मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ‘आकृती’ या नावाने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली. ‘कोरा कागज’, ‘बाजे पायल’ या मालिकांची त्यांनी निर्मिती केली. आशा पारेख यांच्या नावाने मुंबईतील सांताक्रूज येथे एक रुग्णालय सुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यांच्या कल्याणकारी सामाजिक कार्यांच्या आधारावर या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय ‘कलाभवन’ या नावाने त्यांची स्वतःची डान्स अकॅडमी सुद्धा आहे. आशा पारेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन : संजीव वेलणकर