टीम AM : शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्ड किंवा प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतरही दुरुस्त करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम अशा विद्यार्थ्यांवर होणार आहे, ज्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात नाव, जन्मतारीख किंवा इतर नोंदींबाबत अनवधानाने चूक झाली आहे. केवळ संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, या कारणावरून दुरुस्तीची संधी नाकारता येणार नाही. त्यामुळे चुकीच्या प्रमाणपत्रामुळे नोकरी, व्यवसाय, पुढील शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



