स्वच्छता कामगारांची दिवाळी अंधारात : नगरपरिषदेसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन
टीम AM : दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाची उधळण करणारा सण. या सणासाठी वर्षभर सर्वचजण वाट बघत असतात. दिवाळीच्या सणानिमित्त अनेकजण नव्या वस्तूंची, कपड्यांची खरेदी करत गोडधोड करुन फटाक्यांची आतषबाजीने हा सण जल्लोषात साजरा करतात. परंतू, ऐन दिवाळीत नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने स्वच्छता कामगारांना पगारापासून ‘वंचित’ रहावे लागत आहे. दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या गुत्तेदारांची लाखोंची बीले अदा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘गुत्तेदार तुपाशी आणि स्वच्छता कामगार उपाशी’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अंबाजोगाई शहराची स्वच्छता अबाधित राहण्यासाठी नगरपरिषदेने गेल्या काही वर्षांपासून खाजगी कंत्राटदाराला स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराच्या मार्फत शहरातील स्वच्छता केली जाते. याच कंत्राटदाराकडे जवळपास शंभर ते दिडशे कंत्राटी स्वच्छता कामगार आहेत. परंतू, गेल्या तीन – चार महिन्यांपासून कंत्राटदाराचे नगरपरिषदेने थकित बीलं अदा न केल्याने कंत्राटदारानेही स्वच्छता कामगारांचे पगार दिले नाहीत. आज होईल ? उद्या होईल ? असे म्हणत जवळपास चार महिन्यांचा कालखंड लोटला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत स्वच्छता कामगारांवर गंभीर परिस्थिती ओढावली आहे. दुसरीकडे नगरपरिषदेच्या गुत्तेदारांची बीलं अदा केल्याने तिजोरीत खडखडाट झाला आहे. नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे पुर्ण पगार देण्याइतकेही पैसे नगरपरिषदेच्या तिजोरीत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गुत्तेदारांकडे पैसे मुबलक असतात, त्यांची बीलं थोडी उशिरा अदा केली असती तर काहीच फरक पडला नसता. पण याच ठराविक गुत्तेदारांमुळे जवळपास दिडशे कामगारांच्या कुटुंबावर दिवाळीत उपासमारीचे संकट ओढावले आहे. दिवसभर शहराची स्वच्छता करत अंबाजोगाई शहराचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या या कामगारांवर उपासमारीची वेळ येणे हे निश्चितचं निंदनीय बाब आहे.
नगरपरिषदेसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन
नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आज दिनांक 21 आक्टोबर रोजी कार्यालयासमोर एकत्र येत ‘भीक मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार हजर होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. थकित वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी स्वच्छता कामगारांनी केली आहे. नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते ? याकडे स्वच्छता कामगारांचं लक्ष लागले आहे.



