दिग्गज अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड : सिनेजगतात हळहळ

टीम AM : आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झाले आहे. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

असरानी यांचे आज (20 नोव्हेंबर) सायंकाळी चार वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना ‘आरोग्य निधी’ या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले आहे.