टीम AM : ती एक साधीशी स्वयंपाकीण, नाव बबिता ताडे. अमरावती जिल्ह्यातील शाळेत ‘मिड डे मील’ योजनेत काम करत होती. दिवसाला शेकडो मुलांना खिचडी बनवून देणारी ती, सगळ्यांच्या प्रेमाने ‘खिचडी काकू’ म्हणून ओळखली जात असे. महिन्याला मिळणारा पगार फक्त 1500 रुपये. एवढ्या कमी उत्पन्नावर घर चालवणे, मुलांच्या शिक्षणाची सोय करणे आणि स्वतःच्या आयुष्याची स्वप्नं पूर्ण करणं हे जवळपास अशक्यच वाटत होतं. पण बबिता यांच्या मनातली स्वप्नं मात्र मोठी होती.
कॉलेजबाहेर असतानाच तिचं लग्न झालं आणि त्यामुळे ‘युपीएससी’ करून अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण जगायचं तिनं थांबवलं नाही. तिला वर्तमानपत्रं वाचायची आवड होती, सतत करंट अफेअर्सकडे लक्ष ठेवायची, आणि त्याचं फळ तिला नंतर मिळालं.
एक दिवस तिनं ठरवलं की ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घ्यायचा. अमिताभ बच्चनांसमोर बसणं हीसुद्धा तिच्यासाठी मोठी गोष्ट होती. पण प्रश्नांवर तिची पकड पाहून सगळेच थक्क झाले. सातत्याने योग्य उत्तरे देत ती 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तिचा विजयी प्रश्न होता – ‘मुगल सम्राट बहादुरशहा जफरच्या दरबारातील कोणत्या कवीने 1857 च्या बंडाचा वैयक्तिक अनुभव लिहून ठेवलेला ‘दास्तान – ए – गदर’ हा ग्रंथ लिहिला ?’ योग्य उत्तर होतं – झहीर देहलवी.
तीनं 1 कोटी रुपयांवर गेम थांबवला. कारण 7 कोटींच्या प्रश्नावर तिला खात्री नव्हती. एवढं मोठं बक्षीस जिंकल्यावरही ती म्हणाली, ‘मी खिचडी बनवणं थांबवणार नाही. मुलांसाठी, समाजासाठी ही सेवा माझ्या मनापासूनची आहे.’ एवढ्या साध्या मनाने बोलणारी बबिता ताडे लोकांच्या हृदयात घर करून गेली.
बक्षिसाची रक्कम ती शंकराच्या मंदिरासाठी व मुलांच्या भविष्यासाठी वापरू इच्छित होती. आपल्या संघर्षाने आणि प्रामाणिक मेहनतीने ती सर्वसामान्य स्त्रियांना प्रेरणा देऊन गेली. साधं आयुष्य, मोठी स्वप्नं आणि ती पूर्ण करण्यासाठी असलेली जिद्द, हाच तिच्या यशाचा खरा मंत्र होता.
आज बबिता ताडे केवळ करोडपती नाही तर देशभरातील लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. कमी पगारात आयुष्य जगणारी ‘खिचडी काकू’ आता मेहनत, ज्ञान आणि आत्मविश्वास यामुळे लोकांच्या डोळ्यांत ‘हिरो’ बनली आहे.


