शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर : आमदार रोहित पवार
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा, कोपरा, अंजनपूर, देवळा, बोरगाव, आपेगाव आणि अकोला तसेच केज तालुक्यातील इस्थळ व बनसारोळा या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून पिकांचे नुकसान, घरांना पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गावांना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी गावोगावी फिरून शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी मदत व तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, केशव नाना ढगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहित पवार यांनी शासनस्तरावर या प्रश्नांची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर : आमदार रोहित पवार
संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्यांनी पात्र सोडल्याने दोन्ही बाजूला सुमारे 1 ते 2 कि.मी.पर्यंत पाणी पसरले असून नदीलगतची शेती मातीसकट वाहून गेली आहे. घरामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक बंधारे फुटले, रस्ते व पूल वाहून गेले, विहीरी गाळाने भरल्या, तर विजेची यंत्रणा कोलमडून पडली. पशुधनही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या झालेल्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी. तसेच पूरग्रस्त भागात आरोग्य व स्वच्छतेसाठी वैद्यकीय पथकं पाठवून पुरेशी औषधं उपलब्ध करून द्यावीत,’ अशी मागणी त्यांनी केली.



