टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील नितीन चव्हाण या मराठा बांधवाने 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत तातडीची मदत म्हणून नाथ प्रतिष्ठानकडून एक लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केली.
नितीन चव्हाण यांना दोन मुली असून त्या दोन्ही चिमुकल्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आ. धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे.
तसेच राज्य शासनाकडून या कुटुंबास विशेष आर्थिक मदत केली जावी, यासाठी देखील मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे, असे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष राजेसाहेब औताडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.



