अंबाजोगाईत भरपावसात गणरायाचे आगमन : भक्तांचा पावसातही उत्स्फूर्त जल्लोष

टीम AM : अंबाजोगाई शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले. सकाळपासूनचं शहरात ढगाळ वातावरण होते तर सांयकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसाची तमा न बाळगता गणेशभक्तांनी उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत केले. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर, गल्लीबोळांत ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात वातावरण दुमदुमले. ढोल – ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह गणेश मूर्तींचे आगमन सोहळे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

अंबाजोगाई शहरातील प्रमुख मंडळांसह अनेक घरगुती गणेशोत्सव मंडपांत आकर्षक सजावटीची धडपड सुरू होती. महिलांनी पारंपरिक नृत्य, तर तरुणाईने ढोल -‌‌ ताशांच्या तालावर ठेका धरत गणेश आगमन सोहळ्याला अधिकच उत्साहपूर्ण व रंगतदार स्वरूप दिले.

पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, तर मंडप उभारणीची कामेही थोडी अडचणीत आली. तरीसुद्धा भक्तांचा उत्साह अबाधित राहिला. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच बाप्पाचे स्वागत करण्यासाठी पावसाला न जुमानता सहभाग नोंदवला.

अंबाजोगाईत गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर आणि सांस्कृतिक उपक्रमांसह साजरा होतो. यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धा, सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. पावसातही झालेल्या या उत्स्फूर्त स्वागतामुळे शहरभरात गणेशोत्सवाचा उत्साह दुणावला असून, पुढील दहा दिवस अंबाजोगाईत गणेशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.