बिबट्याची दहशत : रस्ते होतायतं सामसूम ! वाचा… 

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या गावात बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याच्या भीतीने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावल्याने रस्ते सामसूम झाले आहेत.

अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत असते. यावेळी या परिसरात बिबट्या न आढळता पूस – जळगाव परिसरात बिबट्‌याचे दर्शन झाले. त्यानंतर बिबट्याने ‘ग्रीन बेल्ट’ परिसरात आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी असलेल्या माकेगाव या गावातील रवी देशमुख यांच्या बैलाचा फडशा पाडत त्यास दीडशे फूट ओढत नेले. ही घटना सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. थंडीचे दिवस असल्याने नागरिक रोज पहाटे पाच वाजता घराबाहेर पडून ‘मॉर्निंग वॉक’ साठी फिरत होते. परंतू, बिबट्याच्या भीतीने ‘मॉर्निंग वॉक’ साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली असूर रस्ते सामसूम झाले आहेत.

दरम्यान, बिबट्या एक आहे की, अनेक याचाही वनविभागाला अद्याप शोध लागलेला नाही. परिसरात पिंजरा ठेवावा, अशी मागणीही ग्रामस्थांतूनन् पुढे आली आहे. बिबट्या प्रत्यक्ष ग्रामस्थांनी बघितल्याने त्याच्याबद्दल दहशत वाढली असून बिबट्या कधी, कुठे ? दर्शन देईल याची शाश्वती न राहिल्याने नागरिक स्वतःहूनच काळजी घेताना दिसत आहेत. वनविभागाकडूनही नागरिकांना सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे. परंतू, हा बिबट्या पिंजऱ्यात कैद करुन नैसर्गिक अधिवासात नेवून सोडल्यानंतरच नागरिकांची भीती दूर होईल, अशा प्रतिक्रिया होत आहेत. 

अफवा पसरवू नका 

अंबाजोगाई परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेच्या अनुषंगाने इतरत्र ठिकाणचे जुने बिबट्याचे व्हिडीओ शेअर केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणीही अशा अफवा किंवा व्हिडीओ शेअर करून नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here