टीम AM : ग्रामीण भागाला जोडणारा अंबाजोगाई – येल्डा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेक वेळा मागणी करुनही रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या रस्त्यावर काल एक दुर्दैवी घटना घडली. गडदेवाडी येथील सुभाष गडदे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, गडदेवाडी येथील सुभाष गडदे हे काल दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून अंबाजोगाईला येत होते. रात्रीच्या अंधारात मुकुंदराज जवळील रस्त्यावरील पुलाला त्यांच्या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा अंबाजोगाई – येल्डा रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम गतीने पुर्ण झाले असते तर ? संबंधित कंत्राटदाराने ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले असते तर ? असे कितीतरी प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहेत.
अंबाजोगाई – येल्डा रस्त्यासाठी आंदोलने
अंबाजोगाई – येल्डा हा ग्रामीण भागाला जोडणारा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा, या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी, ग्रामीण भागातील जनतेनी अनेकदा मागणी केली, आंदोलने केली. परंतू, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्त्यासंदर्भात आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधींनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा रस्ता पुर्ण करण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी या भागातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.