टीम AM : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत.
दरम्यान, सरकारने नुकतेच या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. तुम्हीही अर्ज केला आहे, मात्र अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका. कारण नवीन बदलानुसार अजूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होतील. मात्र, नेमक्या कोणत्या महिलांना 4 हजार 500 रुपये मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. पण, या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आहे. यावेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आणि 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणून निश्चित केली गेली. अशा परिस्थितीत ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा 17 ऑगस्टपूर्वी अर्ज केले आहेत त्यांना दोन हप्त्यांचे पैसे म्हणजेच 1500 नुसार 3000 रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.
तर, ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणार त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. एकाच वेळी महिलांच्या खात्यात तीन हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होतील. नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.