टीम AM : पाणीटंचाईच्या प्रसंगी अंबाजोगाईकरांना शेवटचे आशास्थान असलेल्या काळवटी तलावाची उंची एक मीटरने वाढविण्यास शासनाने मान्यता दिली होती. केज विधानसभा मतदार संघाच्या तत्कालीन आ. संगीता ठोंबरे यांनी काळवटी तलावाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतू, निधीच्या नावाखाली जलसंपदा व पाटबंधारे विभागाने यात खोडा घातल्याने काळवटी तलावाची उंची वाढवण्याचा प्रश्न रखडला आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे
अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो तर काळवटी तलावाचा राखीव पाणीसाठा म्हणून वापर होतो. मांजरा प्रकल्पातील पाणी संपल्यानंतर काळवटी तलावातील पाणीसाठ्यामुळे शहराला अल्पकाळासाठी दिलासा मिळतो. मात्र, लोकसंख्या वाढत गेल्याने हा पाणीसाठा देखील अपुरा ठरू लागला होता. त्यामुळे तलावात अधिक पाणीसाठा राहावा, यासाठी तलावाची उंची दोन मीटरने वाढविण्याची मागणी पुढे आली. लोकभावना लक्षात घेता तत्कालीन आ. संगीता ठोंबरे यांनी या मागणीला प्राधान्य देत शासनाकडे ही मागणी लावून धरली आणि सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद देत साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठी तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर अंबाजोगाई नगपरिषदेने नगरपरिषद संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. या समितीने काळवटी तलावाची उंची वाढविण्याची शिफारस शासनाकडे केली होती.
3 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर
सदरील शिफारशीवर सकारात्मक निर्णय घेत शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत काळवटी तलावाची उंची एक मीटरने वाढविण्यास मान्यता दिली आणि त्यासाठी 3 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर केला. या खर्चातील 85 टक्के वाटा राज्यसरकार उचलणार होते तर उर्वरित 15 टक्के खर्च नगर परिषद करणार होती. दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या काळात अंबाजोगाईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार होता. परंतू, तसे न होता जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने निधीसाठी यात खोडा घातल्याने काळवटी तलावाची उंची वाढवण्यासाठी अडथळा निर्माण झाला.
निधी मिळाल्याशिवाय काम करणार नाहीत
काळवटी तलावाची उंची वाढवण्यासाठी शासनाकडून 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 49 लाख रुपयांचा निधी नगरपरिषद, अंबाजोगाई यांच्याकडे वर्गही करण्यात आला आहे. परंतू, शासनाच्या जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने पुर्ण निधी प्राप्त झाल्याशिवाय काम करणार नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे काळवटी तलावाची उंची वाढवविण्याचा प्रश्न कागदावरचं राहिला आहे.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा
काळवटी तलावाची उंची वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शासनाकडे रखडलेला निधी उपलब्ध झाला तर जलसंपदा व पाटबंधारे विभाग कामाला सुरुवात करतील. त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असणेही तितकेच गरजेचे आहे. काळवटी तलावाची उंची वाढविल्यास भविष्यात काळवटी तलावात मुबलक पाणीसाठा राहून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.