‘स्वाराती’ साठी माजी आ. ठोंबरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली करोडो रुपयांच्या इमारतींची कामे रखडली

लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज : विद्यार्थ्यांना होतोय त्रास

टीम AM : गोरगरिब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंदचा प्रश्न गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील अनेक इमारतींची बांधकामे निधीअभावी रखडली आहेत. ही बांधकामे रुग्णालय परिसरात अर्धवट स्वरुपात असून संबंधित कंत्राटदार शासनाकडून बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची वाट पहात आहेत. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या परिसरात बाह्य रुग्ण विभाग, पदव्युत्तर आणि पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मंजूर केल्यानंतर संबंधित गुत्तेदारांनी बांधकाम सुरुही केले. काही इमारतींचे अर्धवट बांधकामही पुर्ण झाले. परंतू, मधल्या काळात काही कारणास्तव या इमारतींना मिळणारा निधी रखडला आणि बांधकाम पूर्णपणे ठप्प झाले. निधी आज येईल, उद्या येईल असे करत करत जवळपास चार ते पाच वर्षांचा कालावधी यात निघून गेला. आजही या इमारतींचे बांधकाम काही प्रमाणात पूर्ण झाले असले तरी ‘जैसे थे’ याच अवस्थेत असून राज्य सरकार कधी आपल्याला निधी उपलब्ध करुन देते याकडे संबंधित गुत्तेदारांचे लक्ष लागले आहे. 

संग्रहित छायाचित्र

पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना होतोय त्रास

‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने त्यांना आहे त्या वसतिगृहात जागा अपुरी असल्याने त्यांच्यासाठी ही नवीन वसतीगृहं बांधण्यात येत आहेत. परंतू, गेल्या काही वर्षांपासून या वसतीगृहांची बांधकामे निधीअभावी रखडल्याने त्याचा त्रास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आज ही पदवी आणि पदव्युत्तरचे विद्यार्थी मोडकळीस आलेल्या डॉक्टरांच्या निवासस्थानात राहून शिक्षण घेत आहेत. त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे.  

बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीत इलेक्ट्रिसीटीचे बांधकाम बाकी

‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले असले तरी यातील इलेक्ट्रिसीटीचे काम अजून बाकी आहे. या कामासाठीही निधीची आवश्यकता असून त्यामुळेच हेही काम रखडले आहे. या इमारतीत बाह्य रुग्ण विभाग शिफ्ट झाल्यानंतर रुग्णांना एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. 

लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या काही महिन्यांत 50 वर्ष पूर्ण होतील. त्या अगोदर ही रखडलेली बांधकामे पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.