देवगिरीची तनिषा वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम : मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल

टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल 93.37 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत 600 पैकी 600 गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

छत्रपती संभाजीनगर विभागात इयत्ता बारावीच्या निकालात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्याचा निकाल 95.70 टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा निकाल 94.71 टक्के, हिंगोलीचा 94.08 टक्के, तर परभणी जिल्ह्याचा निकाल 90.42 टक्के इतका लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, या परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.