टीम AM : आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची संघर्षगाथा सांगणार आहोत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे झाला. नवाजुद्दीनचा जन्म एका सामान्य मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्याने स्वत:च्या टॅलेंटच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवलं आहे. नवाजुद्दीनने बालपणी अत्यंत हलाखीचे दिवस पाहिले आहेत. नवाज त्याच्या आई-वडील आणि 8 भावंडांसोबत एका घरात राहत होता.
नवाजने हरिद्वारच्या गुरुकुल कांगरी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर काही वर्षे वडोदरातील थिएटरमध्ये काम केलं आणि त्यानंतर दिल्लीतील एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. 1999 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी दिल्लीहून मुंबईत आला. बऱ्याच संघर्षानंतर त्याच वर्षी त्याला एक चित्रपट मिळाला ज्यात त्याची छोटीशी भूमिका होती. तो चित्रपट होता आमिर खानचा ‘सरफरोश’. यानंतर नवाज राम गोपाल वर्मा यांच्या ‘शूल’ आणि ‘जंगल’ यासोबतच संजय दत्तच्या गाजलेला चित्रपट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्येही नवाज एका छोट्या भूमिकेत दिसला होता.
नवाजुद्दीनने जवळजवळ 8 वर्षे चित्रपटसृष्टीत कठीण संघर्ष केला. नवाजला बऱ्याच चित्रपटांमध्ये खूप छोट्या भूमिका मिळत होत्या ज्यात त्याचे फक्त एक-दोन ओळींचे संवाद असायचे. 2012 मध्ये त्याचं नशीब पालटलं जेव्हा त्याला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमात मुख्य भूमिका मिळाली. या सिनेमामुळं नवाजुद्दीन सिद्दीकी लोकप्रिय झाला. त्याचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
‘गँग्स ऑफ वासेपूर’ नंतर इंडस्ट्रीतील लोक नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखू लागले आणि त्याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. नवाजने सलमान खानसोबत ‘किक’ (2014), आमिर खानसोबत ‘तलाश’ (2012) आणि शाहरुख खानसोबत ‘रईस’ (2017) सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. या चित्रपटांशिवाय नवाजने ‘बजरंगी भाईजान’, ‘मांझी’, ‘हीरोपंती 2’, ‘बंदूकबाज’, ‘ठाकरे’, ‘मॉम’, ‘कहानी’ आणि ‘हाऊसफुल 4’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आता मुख्य अभिनेता सोबतच सहाय्यक अभिनेता म्हणूनही काम करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीला एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये मिळतात. तर एका जाहिरातीसाठी तो 1-2 कोटी रुपये घेतो. याशिवाय नवाज सोशल मीडियावरूनही कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची सध्या जवळपास 120 कोटी रुपयांची संपत्ती आहे.