यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी चौक झाला मॉर्निंग वॉक
अंबाजोगाई : प्रादेशिक परिवहन विभाग, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, पोलिस प्रशासन, बांधकाम विभाग व विविध संस्थांच्या वतीने शनिवारी सकाळी, महावॉकेथान द्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश शहरात राबविण्यात आला. या महावॉकेथानमध्ये अंबाजोगाईकरांनी यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी चौक या मार्गावरून मॉर्निंग वॉक केला.
शहरवासियांमध्ये वाहन चालवतांना स्वत:च्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम त्यांना अंगिकृत व्हावे, या उद्देशाने या महावॉकेथानचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी यशवंतराव चौक येथून सुरू झालेल्या मॉर्निंग वॉकचा शिवाजी चौकात समारोप झाला. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, ज्येष्ठ नागरिक संघ, राष्ट्रीय छात्रसेना, शालेय विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनधी यांच्यासह मान्यवरांचा सहभाग होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप बारकुल, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, रोटरीचे अध्यक्ष प्रा. सचिन कराड, सचिव स्वप्निल परदेशी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॉर्निंग वॉकला प्रारंभ झाला. शिवाजी चौकात झालेल्या समारोप समारंभात उपस्थित संस्था पदाधिकाऱ्यांचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.