अंबाजोगाईत डेंग्यूचे थैमान : शेकडो रुग्णांवर उपचार सुरू, आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून याकडे आरोग्य प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास शेकडो रुग्ण या आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शहरातील बारभाई गल्लीमधील एका 9 वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. याकडे आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाई शहरात 45 आणि तालुक्यात जवळपास 57 असे एकूण 102 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. या रुग्णांवर खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे.

खाजगी, शासकीय रुग्णालय ‘हाऊसफुल्ल’ 

अंबाजोगाई शहरासह तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील विविध खाजगी व शासकीय रुग्णालय ‘हाऊसफुल्ल’ झाले असून सदरील रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यात लहान मुलांचा अधिक समावेश आहे. वाढत्या डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या डेंग्यू आजाराचा सामना करण्यासाठी अंबाजोगाईतील जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन ‘अंबाजोगाई मिरर’ कडून करण्यात आले आहे.