टीम AM : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थ्यांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, श्रीमती चित्रा वाघ, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात 12 हजार 500 रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी 100 कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ‘रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत एक वर्षातील आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.
मदतीचा हात पुढे करताना मोजमाप नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटींचा आकडा कधी पोहोचला हे समजलेसुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाहीत, मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो. आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले आहे.