स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली ‘युवा स्वतंत्रता ज्योत’ रॅली : अंबाजोगाई जिल्ह्यासाठी पाठपुरावा करु – आ. रोहित पवार

टीम AM : समाजात राष्ट्रभक्ती, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा बळकट व्हावी, या उद्देशाने अंबाजोगाईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वतंत्रता ज्योत’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत युवकांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचा मोठा सहभाग होता. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहित पवार, रोहित पाटिल (तासगांव) यांचाही रॅलीत सहभाग होता.

गेल्या सोहळा वर्षांपासून अंबाजोगाई शहरात ‘युवा स्वतंत्रता ज्योत’ रॅलीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या रॅलीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाला. ही रॅली कुत्तरविहीर, मंडीबाजार, गुरुवारपेठ, गांधी,नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक मार्गे रॅलीचा समारोप वेणूताई चव्हाण कन्या विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीताने व संविधानाची सामूहिक शपथ घेऊन झाला.

या रॅलीत आ. रोहित पवार, रोहित पाटिल, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अशोकराव देशमुख, प्रा. नानासाहेब गाठाळ, संतराम कराड, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस. बी. सय्यद, डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, मुजीब शेख, प्रतिभा देशमुख, अरुंधती पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी व युवक – युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

एकता, बंधुभाव जोपासा : आ. रोहित पवार

युवकांनी राष्ट्रभक्ती, देशप्रेम व बंधुभाव जोपासावा, सार्वभौमत्व ही महत्वपूर्ण बाब आहे, सर्वप्रथम राष्ट्र, मग इतर बाबी. युवकांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. राष्ट्र मजबूत करण्यासाठी युवासंघटन महत्वपूर्ण ठरते. यासाठी युवकांनी योग्य दिशा ओळखून काम केले पाहिजे. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवा, असे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले.