बसमधून वृध्देचे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने लंपास : गुन्हा दाखल

टीम AM : मुलाला भेटून लातूरहून अंबाजोगाईला परत निघालेल्या वृद्धेचे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि 32 हजारांची रोख रक्‍कम ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी बसमधून लंपास केली. चोरीची ही घटना गुरुवारी (दि.18) सकाळी बस अंबासाखर कारखाना येते आली असता उघडकीस आली. 

चित्ररेखा दगडुसाहेब खंदारे (रा. पोखरीरोड, अंबाजोगाई) यांचा मुलगा राहुल शिक्षणासाठी सध्या लातूर येथे वास्तव्यास आहे. राहुल याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने त्याला भेटून चित्ररेखा या गुरुवारी सकाळी लातूर – कल्याण बसने अंबाजोगाईला निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी पाटल्या, गंठन, अंगठ्या, झुंबर आदी जवळपास साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि 32 हजार रुपये रोख रक्‍कम असलेली बॅग स्वत:च्या पायाजवळ ठेवली होती. वाटेत अज्ञात चोरट्याने त्या बॅगमधील सर्व ऐवज लंपास केला. 

बस अंबासाखर कारखाना येथे आली असता चित्ररेखा यांनी बॅग तपासल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सदरिल फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करित आहेत.