अलका याज्ञिक यांचा वाढदिवस : वयाच्या 6 व्या वर्षी केली होती करिअरची सुरुवात

टीम AM : 90 च्या दशकांतील लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक या आज (20 मार्च) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. अलका यांचा जन्म कोलकाता येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आई शुभा याज्ञिक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती.

घरातच संगीताची पार्श्वभूमी असल्याने, बालपणापासूनच अलका यांना देखील संगीताची गोडी लागली होती. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षीच त्यांनी कामाला सुरुवात केली होती. वयाच्या 6 व्या वर्षीच अलका यांनी आकाशवाणी कोलकात्यात गायला सुरुवात केली.

वयाच्या 10 व्या वर्षी अलका याज्ञिक आपल्या आईसोबत मुंबईत आल्या आणि त्यांनी चित्रपट निर्माते राज कपूर यांची भेट घेतली. राज कपूर यांना अलका यांचा आवाज खूप आवडला. त्यांनी त्यांची लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली.

वयाच्या 14 व्या वर्षीच अलका यांनी ‘पायल की झंकार’ चित्रपटातील ‘थिरकट अंग लचक झुक्की’ हे गाणे गायले होते. त्यानंतर 1981 मध्ये आलेल्या ‘लावारीस’ चित्रपटात ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ हे गाणे गायले. मात्र, तरीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ गाण्यानंतर अलका यांना पार्श्वगायिका म्हणून ओळख मिळाली. ‘एक दो तीन’ या गाण्यानंतर अलका यांनी आतापर्यंत सुमारे 700 चित्रपटांमध्ये 20 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

अलका यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ज्यात ‘अगर तुम साथ हो’, ‘टिप टिप बरसा पानी’, ‘मैय्या यशोदा’, ‘चुरा के दिल मेरा’, ‘परदेसी परदेसी’, ‘तुझे याद ना मेरी आयी’, ‘दिल लगा लिया’, ‘कुछ कुछ होता है’, ‘चांद छुपा बदल में’, ‘ए मेरे हमसफर’ यासह इतर अनेक गाणी त्यांनी गायली. त्यांना 7 वेळा फिल्मफेअर आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अलका यांनी 1989 मध्ये नीरज कपूर सोबत लग्न केले. अलका याज्ञिक गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे आजच्या संगीतात झालेला बदल. बॉलिवूडच्या गाण्यांचा ट्रेंड इतका बदलला की, 90 च्या दशकातील गायकांना काम मिळणे जवळपास बंद झाले आहे.