राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातर्फे विधीज्ञ तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. 

सत्तेत सहभागी असलेल्या आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे काय काढू शकतात, असं विचारत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. 

शिंदे गटाचे आमदार जर शिवसेनेचे सदस्य असतील, तर सभागृहात बहुमताचा संबंधच काय, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. सुमारे तीन वर्ष सत्तेत राहिल्यानंतर 34 आमदारांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्नही न्यायालयाने शिंदे गटाच्या भूमिकेवरही विचारला आहे.