आडस : आडस येथे एका घरात स्वयंपाक करताना अचानक पेट घेतला व मोठा स्फोट होऊन यामध्ये मुलगी जळून जागीच ठार झाली तर आई गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना सायंकाळी घडली आहे. जखमी महिलेला अंबाजोगाई येथे ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कमल आश्रुबा इंगळे रा. आडस (ता. केज) असे मयत महिलेचे नाव आहे तर जखमीचे लोचनाबाई आश्रुबा इंगळे असे नाव आहे. या दोन्ही नात्याने मुलगी व आई आहेत. यांना दिनेश इंगळे हा अपंग मुलगा असून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालवतो व त्यामध्ये पेट्रोल विक्रीसाठी ठेवतो. आज गुरुवारी (दि. 2) सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घरात मुलगी व आई दोघे मिळून स्वयंपाक करताना अचानक घराने पेट घेतला. पेटते घर पाहून आई व मुलीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अचानक स्फोट झाला, आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे कमल इंगळे या जळून जागीच ठार झाल्या तर आई भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे, पोलीस व धारुर अग्निशामक दल दाखल झाले आहे. या घटनेने आडस परिसरात एकच खळबळ उडाली आहे.