परभणी : बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच पेपर फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा शिक्षकांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानदानाचे काम करण्याची जबाबदारी असणाऱ्या गुरुंनीच हे असले कृत्य केल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षेबाबत परभणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा प्रकार समोर आला. इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हाटसॲपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.