महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दुसऱ्या दिवसाची सुनावणी पूर्ण : उद्या पुन्हा सुनावणी 

नवी दिल्ली : राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज दुसऱ्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली असून, उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून विधिज्ञ हरीश साळवे यांनी आज युक्तिवाद केला. 

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना त्यांनी, आमदारांना 25 जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असं नमूद केलं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला, असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. 

कायदा पक्षांतर बंदीसाठी आहे, मतभेदांसाठी नाही, असा युक्तीवाद साळवे यांनी केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही, असं ते म्हणाले.