औरंगाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथकं साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचली आहेत. निवडणुकीसाठी जिल्हानिहाय पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदान उद्या 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे. विभागात असलेल्या 227 मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाही. मतदान प्रक्रियेचं अखंडीतपणे व्हिडीओग्राफी तसंच वेबकास्टींग केले जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांनी मतदानासाठी मतपत्रिकेसोबत दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करावा. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एक हा अंक नमूद करावा. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शवणं ऐच्छिक आहे. एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर एक हा अंक नमूद करू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.