अभिनंदनीय : अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया करून वाचवला रुग्णाचा हात, ‘स्वाराती’ च्या डॉक्टरांचं होतयं कौतुक

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आशिया खंडात सर्वात मोठे आहे व येथे विविध आजारावर उपचार केले जातात. डॉ. लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग विभागामध्ये उपचार केले जातात. 

काही दिवसांपूर्वी एक रुग्ण हाताला गाठ वाढत चालली आहे व खूप त्रास होत आहे. काही ठिकाणी हात कापावा लागेल व हाडाचा कर्करोग आहे, असे सांगत अंबाजोगाईला आला. त्यांनी डॉ. बालाजी भराटे यांना दाखवले. त्यावर डॉक्टरांनी रुग्णाला हात वाचवू शकतो व शस्त्रक्रिया करू शकतो, असे सांगितले. त्यानंतर रुग्णाची सुई टाकून तपासणी करून ती गाठ (जीयांत सेल टुमर) असून अतिशय दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी ती गाठ काढून तेथे पायाच्या हाडाचा तुकडा बसवून हाड जोडण्यात आले. त्यामुळे हात कापण्यापासून वाचवला. अशा शस्त्रक्रिया डॉ. बालाजी भराटे यांनी नागपूर येथे केल्या होत्या व त्याच आधुनिक पद्धतीचा वापर करून येथे ही शस्त्रक्रिया पार पाडली. 

यावेळी डॉ. बालाजी भराटे यांच्यासोबत युनिट प्रमुख डॉ. काकानी, डॉ. जैन , डॉ. लाड, डॉ. दत्ता, डॉ. विलास व भुलतज्ञ टीम यांनी सहकार्य केले. अतिशय अवघड असणारी शस्तक्रिया डॉ. बालाजी भराटे व त्यांच्या टीमने अंबाजोगाई येथे पार पडली. यावेळी रुग्णांचे नातेवाईक व रुग्ण यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.

हाडाचे कर्करोग हे काही लोकांमध्ये आढळतात, परंतू त्याच्या उपचारासाठी टाटा, केईम मुंबई येथे जावे लागत असल्याने रुग्ण उपचार घेणे टाळतात. परंतू आता अंबाजोगाईमध्ये पण आशा आजारावर आधुनिक पद्धतीने व तज्ञ डॉक्टरमुळे मोफत उपचार शक्य झाले आहेत. तरी अश्या रुग्णांनी लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे ,जेणेकरून हात व पाय तोडायची गरज पडणार नाही व आजार शरीरात दुसरीकडे पसरणार नाही. – डॉ. बालाजी भराटे, वरिष्ठ निवासी अस्थिरोग तज्ञ , ‘स्वाराती’ रुग्णालय, अंबाजोगाई.