‘हार्टअटॅक’ सारखी जीवघेणी व्याधी टाळता येऊ शकते : समीर मुंशी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये ‘हार्टअटॅक’ संदर्भात जनजागृती कार्यशाळा 

अंबाजोगाई : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये आजीवन शिक्षण विस्तार सेवा विभागाच्यावतीने व निसर्गोपचार संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘हार्टअटॅक’ संदर्भातील जागृती कार्यशाळा घेण्यात आली.

प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केले. ‘सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्यविषयक निष्काळजी दिसून येते. हार्टअटॅकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात जागृती व्हावी, म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले, असे त्यांनी नमूद केले. 

कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समीर मुंशी यांची उपस्थिती होती. त्यांनी याप्रसंगी ‘हार्टअटॅक’ चे विविध प्रकार यासाठी घ्यावयाची दक्षता या सर्वांचे प्रात्यक्षिक, उपचार पद्धती समजावून सांगितली. ‘हार्टअटॅक’ होण्याचे कारणे नमूद करताना त्यांनी ताण – तणाव, चिडचिडपणा, चरबी वाढ या संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावर उपाय म्हणून विविध नैसर्गिक औषधी अतिशय गुणकारक आहेत, असे सांगून त्यांनी प्रत्येकाने अधिकाधिक तनावरहीत राहावे, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी त्यांचे सहकारी सुमित चव्हाण व निखिल पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अहिल्या बरूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गीतांजली माने यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.