यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घर कामगार महिला : जाणीव जागृती कार्यशाळा
अंबाजोगाई : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाच्या वतीने घर कामगार महिलांसाठीची जाणीव जागृती कार्यशाळा दिनांक 17 जून 2022 रोजी पार पडली. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केले. घर कामगार महिला असंघटित असल्याने विविध हक्क व अधिकारापासून वंचित राहतात. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नासंदर्भात जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅड. अजय बुरांडे यांनी ‘घर कामगार महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या महिला कामगारांनी संघटन करावे. तसेच श्रमसंहिता निर्माण करावी. कामगारांना योग्य रोजगार, वेतन मिळाले पाहिजे. यासाठी त्यांनी हक्काने लढले पाहिजे, असे विचार मांडले.
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरुंधती पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांनी अस्तित्वाची जाणीव ठेवावी. स्त्री दास्यत्वाविरुद्ध बंड पुकारत स्वतःचे अस्तित्व, अधिकार, हक्क याच्याप्रती कायम सजग राहावे. आपण करत असलेल्या कष्टाचे योग्य मोल मिळालेच पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका कायम ठेवावी, असे विचार मांडले. कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप दत्तात्रय पाटील यांनी केला. घर कामगार महिलांना कष्टाचा योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग समन्वयक तथा कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. अहिल्या बरुरे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. रोहिणी खंदारे यांनी मानले. कार्यशाळेस 100 पेक्षा अधिक घर कामगार महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. पी. के. जाधव, प्रा. हनुमंत कलबुर्गी यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यशाळेस उपस्थित होत्या.