अंबानगरीत गजानन महाराज विजय ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन

पारायण सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

अंबाजोगाई : येथील गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गजानन महाराज विजय ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळा पारायण प्रमुख हभप आनंद महाराज जोशी नळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 28 मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भाविकांनी पारायणाचा लाभ घेण्याचे आवाहन गजानंन महाराज भक्त मंडळ, अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले आहे.

अंबानगरीत गेली 9 वर्षांपासून भाविकांसाठी तीन दिवसीय गजानन विजय ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे देऊळ व धार्मिक कार्यक्रम बंद होते. त्यामुळे यात्रा, पारायण सोहळे बंदच होते. कोरोनामुळे दोन वर्ष पारायणाचा खंड पडला होता. यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे शासनाने कोविड नियम शिथील केले आहेत. त्यामुळे पुन्हा पुर्वीप्रमाणे सर्व कांही सुरळीत सुरू झाले आहे.

येथील गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने पारायण प्रमुख हभप आनंद महाराज जोशी नळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज विजय ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन योगेश्वरी मंदीरातील हॉलमध्ये करण्यात आले आहे. पारायण सोहळ्याचे यंदाचे 10 वे वर्ष आहे. या सोहळ्यात हभप आनंद महाराज जोशी नळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांची रेलचल आसणार आहे.

25, 26 मे  रोजी पहाटे श्रीचा रुद्राभिषेक, आरती, गजानंन विजय ग्रंथ पारायण व आरती, 27 मे रोजी पारायण, ग्रंथदिंडी व शहरातून श्रीची भव्य पालखी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात हभप गजानंन चौकटे – गेवराई, हभप विष्णू महाराज इरले – अंबाजोगाई यांचे प्रवचन होणार असुन शहरातील भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. 

28 मे शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भगवान महाराज वरपगावकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद, श्रीची नित्य उपासना, दिपोत्सव व शेजारतीने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. अंबाजोगाई व परिसरातील गजानन महाराज भक्तांनी या पारायण सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन गजानंन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.