अर्थसंकल्प 2022 : अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामास 11 कोटी, स्त्री रुग्णालय उभारणीसाठी 14 कोटी 21 लाख

जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी अडीच कोटी

मुंबई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतींचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी 11 कोटी 31 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथे आरटीओ कार्यालय बांधकामासाठी कोविडनंतर एक वर्षाच्या आत निधी देऊ, हा धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अंबाजोगाई येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीची मागणी पूर्ण करत यासाठी 14 कोटी 21 लाख रुपये निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर परळी येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या कामासाठी 20 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 

बीड येथील जिल्हाधिकारी निवासस्थानाचा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी मार्गी लावला आहे. बीड येथे जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी 2 कोटी 56 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारत बांधकामाचा आराखडा देखील मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असून, त्यासही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. 

सन 2022 चा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला, विकासाची पंचसूत्री हाती घेत राज्याच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारती व विविध महत्वाच्या रस्त्यांच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी ना. अजित पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

नगर – बीड – परळी रेल्वेस मिळणार केंद्राच्या समप्रमाणात निधी

बीड जिल्ह्यातील नगर – बीड – परळी या महत्वाच्या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारच्या समप्रमाणात निधी दिला जाईल तसेच बीड जिल्ह्यात स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणी वर्धन करण्यासही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.