अंबाजोगाईत चोरट्यांचा धुमाकूळ : बँकेसमोरून सव्वा लाख रकमेची बॅग घेऊन फरार

वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिक हैराण

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत. शहरात भरदिवसा घडलेल्या लाखांच्या सोन्याच्या चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा दिवसाढवळ्या बँकेसमोरून 1 लाख 33 हजारांची रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाले आहेत. ही घटना मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारीला दुपारी बँक ऑफ इंडिया समोर घडली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणेने कडक पावलं उचलावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

या बाबत ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्‍यातील अंजनपूर येथील विजयकुमार तुळशीराम इस्ताळकर हे मंगळवारी दुपारी  वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच 44 इ 9462) मोंढ्यातील महाराष्ट्र बँकेत गेले. तिथून त्यांनी खात्यातून 1 लाख 33 हजार रुपये काढले. ती रक्‍कम एका कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी मोटारसायकलच्या हॅन्डलला अडकवली आणि जयवंती नगर मधील बँक ऑफ इंडियात जमा करण्यासाठी घेऊन आले. बँकेसमोर गाडी लॉक करत असताना पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी ती पिशवी लंपास करून फरार झाले. 

ही बाब लक्षात आल्याने इस्ताळकर पितापुत्रांनी त्या चोरट्यांचा एसआरटी महाविद्यालयापर्यंत पाठलाग केला. परंतु, ते हाताला लागले नाहीत. दरम्यान अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो. कॉ. नरहरी नागरगोजे करत आहेत.