पाटोदा : अभिजितच्या वैद्यकिय प्रवेशासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

अंबाजोगाई : तालुक्यातील पाटोदा (म.) येथील गावोगाव जाऊन चाळण्या विक्री व्यवसाय करणाऱ्या अर्जुन मस्के यांचा अभिजित मस्के या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत निट परीक्षेत 428 गुण प्राप्त केले. अभिजित याचा विदर्भ आयुर्वेद निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे प्रवेश निश्चित झाला आहे.

परंतु, अभिजित यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रवेश घेण्यासाठी लागणारी बासष्ट हजार रुपयांची रक्कम शुक्ल भरण्यासाठी नसल्याने या कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा राहिला असता ग्रामस्थांनी व सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने प्रवेश शुल्क जमवण्यासाठी लोकसहभागातून निधी जमवण्यासाठी रविवारी मदत फेरी काढण्यात आली.        

माकेगाव येथील अमर देशमुख यांनी यावेळी भरीव सहकार्य केले. तसेच आधार माणुसकीचा व पाटोदा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रविवारी सकाळी मदत फेरी काढली असता ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. या मदतफेरी प्रसंगी आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, ॲड. दीपक कदम, ॲड. श्रीनिवास कुलकर्णी, ॲड. घोबाळे, शिवाजी यादव, मनोज पाडुळे, सतीश पाडुळे, बालासाहेब घोरपडे, नारायण मुळे, सुंदर गवळी, बळीराम सरवदे उपस्थित होते.       

ग्रामस्थांनी एमबीबीएस साठी अंबाजोगाई शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या गावातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी प्रवीण घोरपडे, सुरज गवळी व अभिजित मस्के यांचा सत्कार ॲड. संतोष पवार, ॲड. दिपक कदम, शिवाजी यादव, ॲड. घोबाळे यांच्या हस्ते केला.

समाजातील दानशूर लोकांनीं पुढे यावे

समाजातील दानशूर लोकांनीं अभिजित मस्के यांच्या प्रवेशासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वंचित कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था अंतर्गत ‘आधार माणुसकीचा’ उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले आहे.