मुंबई : ‘बार्टी’ मार्फत सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत त्याची पूर्तता करण्याबाबत विशेष मोहिम राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2021- 22 या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी संबंधित समितीकडे प्रलंबीत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून शासनाच्या निर्देशान्वये ‘बार्टी’ कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना दि. 1 ते दि. 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याबाबत कळविले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पूर्तता करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटीअभावी प्राप्त केलेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांस दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संबंधित समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.