टीम AM : अंबाजोगाई शहरात गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ व्यावसायिकाच्या गळ्यातील 48 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून, सुमारे ₹ 2 लाख 40 हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.
या प्रकरणी सुभाष भगवानराव डोंगरे (वय 81, रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै 2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास सुभाष डोंगरे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी मोठी गर्दी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 48 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हातचलाखीने चोरून नेली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या चैनची किंमत सुमारे ₹ 2 लाख 40 हजार असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या घटनेचा तपास पोलीस हवालदार काळे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांची माहिती संकलित करणे तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



