बससेवा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन, आमरण उपोषणाचा इशारा
टीम AM : अंबाजोगाई आगारातील जुन्या व नादुरुस्त बसांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे आगाराला नव्याने पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस मंजूर झाल्या आहेत. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी, कोळकानडी, माकेगाव, हिवरा, सोमनाथ बोरगाव, धानोरा खुर्द आणि आपेगाव या सात गावांतील ग्रामस्थांनी ‘एसटी’ बस सेवा बंद असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनांचे वाढलेले भाडे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची आर्थिक व मानसिक कोंडी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित ग्रामस्थ लवकरच आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय, प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, आगाराला नव्या बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी सात गावांतील बंद बससेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली असून, आमदार नमिता मुंदडा, प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



