टीम AM : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरात विविध ठिकाणी उत्साहात अभिवादन करण्यात आले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रणजित लोमटे यांच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. चौकात आकर्षक फ्लेक्स लावण्यात आले होते. तसेच विद्युत रोषणाईमुळे चौक अधिकच सुंदर व झगमगाटात फुलून दिसत होता. शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान शाहीर मामा काळे व त्यांच्या संचाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा तसेच प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण केले. पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास व त्यांचे विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात पोवाड्याला दाद दिली.
जयंतीनिमित्त सकाळपासूनचं शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी व नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व शिवप्रेमी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

दरम्यान, आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून निघणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. या मिरवणूकीत मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रणजित लोमटे यांनी केले आहे.
मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत मोटारसायकलवर भगवे झेंडे लावून मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे रॅलीमध्ये तरुणींची उपस्थितीही लक्षणीय होती. रॅलीदरम्यान युवकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणा देत शिवजयंती उत्साहात साजरी केली. शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली मार्गस्थ झाली.



