अंबाजोगाई आगाराला प्राप्त झाल्या 9 इलेक्ट्रिक बस : प्रवास होणार अधिक सुखकर …!

टीम AM : अंबाजोगाई पंचक्रोशीतील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून अंबाजोगाई आगाराला तब्बल 9 नवीन इलेक्ट्रिक बस प्राप्त झाल्या आहेत. चार्जिंग पॉईंटची सुविधा नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अंबाजोगाई आगाराला इलेक्ट्रिक बस मिळाल्या नव्हत्या. मात्र, आता आगार परिसरातचं अत्याधुनिक चार्जिंग पॉईंटची उभारणी पूर्ण झाल्याने या बस अंबाजोगाई आगारात दाखल झाल्या आहेत.

आगार परिसरात नव्या इलेक्ट्रिक बसेसचे विधिवत पूजाअर्चा करून स्वागत करण्यात आले. यावेळी आगारातील अधिकारी अमर राऊत, कर्मचारी उपस्थित होते. या इलेक्ट्रिक ‌बसेस छत्रपती संभाजीनगर, आहिल्यानगर आणि परभणी – लातूर ‌महामार्गावर धावणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व इलेक्ट्रिक बसेस आधुनिक व सर्वसोयींनी युक्त असून प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस लवकरच मार्गावर धावणार आहेत.  

या बसेस प्राप्त झाल्यामुळे अंबाजोगाई व पंचक्रोशीतील प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निश्चितचं प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.