माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी राजकिशोर मोदी मैदानात : प्रचारात झाले सक्रिय
टीम AM : केज मतदारसंघासह अंबाजोगाई शहराचे विद्यमान आमदारांनी वाटोळं केलं असून मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. एकाच घरात तीस वर्षे सत्ता असतानाही त्यांनी अंबाजोगाई शहरातील बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केले आहे. विकासाच्या नावाखाली एकाच रस्त्यावर दोनदा कामं करून फक्त गुत्तेदार पोसायचे आणि त्यांच्याशी भागीदारी करत पैसा कमवायचा, हाच धंदा गेल्या पाच वर्षांपासून अंबाजोगाईकर पहात आले आहेत. रस्ते अपुर्ण, इमारतींची बांधकामं अपुर्ण तरीही अंबाजोगाईकरांवर 150 कोटींचा बोजा टाकण्याचं काम विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. हा बोजा हटविण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे. अंबाजोगाई शहरात आणि केज मतदारसंघात विकासाचं जे खोटं चित्र उभा केलं आहे, तो विकास नसून फक्त विकासाची सूज आहे. त्यामुळे आता अंबाजोगाईची सुजाण जनता यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिला आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्याचे आवाहन देखील मोदी यांनी केले आहे.
केज मतदार संघातील जनमानसाच्या भावनांचा आदर व विचार करून अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या अनेक सहकारी व कार्यकर्त्यांसह केज मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांची बुधवार दि. 6 नोव्हेंबर रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकिशोर मोदी यांच्यावर प्रेम करणारे दीड ते दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बैठकीतील बहुतांश कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज साठे यांना साथ देवून त्यांना प्रचंड बहुतमानी विजयी करण्याचा निश्चय केला. या संवाद बैठकीत राजकिशोर मोदी यांच्यासह दत्ता आबा पाटील, प्रा. वसंत चव्हाण, रिकबचंद सोळंकी, बबन लोमटे, प्रकाश सोळकी, मनोज लखेरा, चंद्रशेखर वडमारे, दिनेश भराडीया , धम्मा सरवदे, संकेत मोदी, किशोर परदेशी, डॉ. राजेश इंगोले, राजेंद्र मोरे, सुनील वाघाळकर, अशोक मोदी, हाजी खालेक, अंकुश हेडे, परमेश्वर वाकडे, गोविंद पोतंगले, अशोक गंडले, अकबर पठाण, शाकेर काझी, महेश कदम, दत्ता सरवदे, मोईन शेख, भाई वजीर शेख, रफिक गवळी यांच्यासह असंख्य सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदरील बैठकीत हाजी खालेक, अकबर पठाण, दयानंद लोंढाळ, मुख्याध्यापक बळीराम जोगदंड, परमेश्वर वाकडे, किशोर परदेशी, चंद्रशेखर वडमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. राजू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, स्वतःच्या विकासापेक्षा कार्यकर्त्यांच्या विकासाला महत्व देणारा नेता असला पाहिजे. राजकिशोर मोदी ठरवतील तीच दिशा व त्याच दिशेने आम्ही वाटचाल करू, अशी ग्वाही याप्रसंगी सर्वांच्या वतीने दिली.
केज विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती : बबन लोमटे
माजी नगरसेवक बबन लोमटे यांनी देखील याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. राजकिशोर मोदी व आम्ही शरीराने जरी महायुतीत असलो तरीही मनाने एक विचाराचे असल्याचे यावेळी बोलून दाखवले. एकाच कुटुंबाचे मतदार संघात झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी या संवाद बैठकीत आपला विचार ठरवायचा असून तो सर्वांनी मिळून एकदिलाने ठरवणार असल्याचे नमूद केले. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाल्याचे बबन लोमटे यांनी सांगितले. सत्तेचा माज उतरवायचा असेल तर साठे सारख्या सामान्य माणसाला निवडून देण्याची साद यावेळी त्यांनी घातली.
अधिकारी – कर्मचारी यांच्यावर निर्माण केली दहशत : मोदी
आपल्या विस्तृत भाषणात राजकिशोर मोदी यांनी केज मतदारसंघात कुणाला मतदान करायचे याबाबत ही कार्यकर्ता बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले. अंबाजोगाई शहर हे अठरापगड जातीचे धर्मनिरपेक्ष असे शहर आहे. विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मतदार संघातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दहशत पसरवली असून ते सर्वजण दहशतीखाली काम करत असल्याचे नमूद केले. सामान्य मतदाराला वेठीस धरण्याचे काम ते करत असून माणूस बघून कोणतेही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मग ज्यामध्ये ‘डीपी’ असो, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे असो किंवा दवाखान्यात रुग्णास दाखल करण्याचा प्रश्न असो, त्यांचा फोन गेला तरचं पुढील काम होते अन्यथा नाही, अशी दहशत आमदारांच्या नातेवाईकांनी निर्माण केली असल्याने सामान्य माणूस यामध्ये भरडल्या जात असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. त्यामुळे अशा पातकी व घातकी आमदार व त्यांच्या नातेवाईकांना पुनः सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी साठे यांना मतदान करून करण्याचे आवाहन राजकिशोर मोदी यांनी उपस्थित जनसमुदायास केले. केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण केज मतदार संघातील त्यांचा दहशतवाद थांबवण्यासाठी एक सामान्य माणूस पृथ्वीराज साठे यांना भरघोस मतदानरुपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे, असेही आवाहन राजकिशोर मोदी यांनी या कार्यकर्ता संवाद बैठकीत उपस्थित सर्व मतदार बांधवास केले. या बैठकीत अंबाजोगाई शहरातील विविध समविचारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते व मतदार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.